Kedgaon News केडगाव , ता. ८ : बोरीपार्धी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील पाटील वस्ती येथे दोन पोती गव्हाच्या कारणावरून सख्ख्या भावांमध्ये झालेला वाद हिंसक वळणावर पोहोचला. “गहू देणार नाही” असे सांगितल्याच्या रागातून भावासह कुटुंबीयांनी शेतकऱ्याला लाकडी काठी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना , ४ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून यवत पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kedgaon News
अमर उर्फ नागेश यादव ताडगे, वनिता अमर ताडगे, यशराज ताडगे आणि भैय्या दत्ता जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विशाल यादव ताडगे (वय ३०, व्यवसाय शेती, रा. बोरीपार्धी पाटील वस्ती, ता. दौंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल ताडगे हे आई, पत्नी आणि मुलांसह वास्तव्यास असून शेती व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेजारीच त्यांचा भाऊ अमर उर्फ नागेश यादव ताडगे हा कुटुंबासह राहतो. दोघांमध्ये शेतीच्या कारणावरून पूर्वीपासून वाद असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशाल ताडगे हे शेजारी भागुजी नेवसे यांच्या दुकानासमोर बसले होते. त्यावेळी अमर उर्फ नागेश ताडगे तेथे आला आणि “तुझ्या गव्हापैकी दोन पोती गहू मला दे,” अशी मागणी केली. मात्र, विशाल ताडगे यांनी गहू देण्यास नकार दिल्यानंतर अमर ताडगे संतापला आणि शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. वाद वाढत असताना आरोपी अमर ताडगे याने तेथे पडलेली लाकडी काठी उचलून विशाल ताडगे यांच्या डोक्यावर, हातांच्या बोटांवर, पाठीवर, छातीवर आणि पोटावर जोरदार मारहाण केली. याच वेळी आरोपीची पत्नी वनिता, पुतण्या यशराज आणि भैय्या दत्ता जाधव यांनीदेखील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. Kedgaon News
या मारहाणीत विशाल ताडगे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनेनंतर पीडिताच्या आईने त्यांना पोलीस ठाण्यात आणून तक्रार दाखल केली. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात अमर उर्फ नागेश यादव ताडगे, वनिता अमर ताडगे, यशराज ताडगे आणि भैय्या दत्ता जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Kedgaon News







