Junner Crime | लोणी काळभोर, (पुणे) : दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर गेल्याचा फायदा घेवुन घरात घुसुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून फरार असलेल्या सराईत आरोपीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
आकाश प्रकाश विभुते (वय ३२, मुळ रा. सुपली, पो. पळशी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, सध्या रा. फुलसुंदर अपार्टमेंट, आनंदवाडी, ता. जुन्नर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यतील सांगोला, करकंब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर परीसरात दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर गेल्याचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसुन ५ लाख ४६ हजार ४८१ रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची तक्रार नारायणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
जुन्नर तालुक्यात दशक्रियाविधीच्या वेळी घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधुन दिवसा घरफोडी झाल्याच्या दोन मोठ्या घटना जुन्नर तालुक्यात घडल्या होत्या. सदर घटना गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घरफोडयांबाबत माहिती देऊन योग्य त्या सुचना देऊन कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा जुन्नर विभागात तपास करीत असताना स्थानिक गुन्ह्याच्या पथकाच्या पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आकाश विभूते याला नारायणगाव परीसरातुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने जुन्नर तालुक्यातील गोळेगाव व निरगुडे गावचे हद्दीतून दिवसा घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
५ लाख ४६ हजार ४८१ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त….
दरम्यान, चोरी केलेले सोन्याचे दागिने, गुन्हात वापरलेली मोटार सायकल असा एकूण ५ लाख ४६ हजार ४८१ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीने याअगोदर जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतदोन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातहि चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकिर,पोलीस नाईक संदिप वारे, अक्षय नवले, दगडु विरकर यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!