जेजुरी, (पुणे) : अनैतिक संबंधास मुलगा अडथळा ठरू लागल्याने आई व तिच्या प्रियकराने मिळून मुलाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या खूनप्रकरणी मुलाच्या आईला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राणू शंकर पवार व उमेश अरुण साळुंखे (रा. दोघेही मोडलिंब ता. माढा जि. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर चुटक्या शंकर पवार (वय-०४, रा. मोडनिंब असे खून झालेल्या चार वर्षीय मुलाचे नाव आहे. याप्रकरणी संगीता विठ्ठल चव्हाण (वय – २५, रा. करकम ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड महिन्यापूर्वी भुलेश्वर घाटामध्ये एका तीन ते चार वर्षीय मुलाचा मृतदेह हा साडीमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
याप्रकरणी संगीता विठ्ठल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे मजुरीसाठी त्यांची चुलत बहीण राणू पवार व तिचा प्रियकर उमेश साळुंखे आले होते.
यावेळी दीड महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास प्रेमात अडथळा होत असलेला चार वर्षीय चुटक्या पवार याचा गळा दाबून त्यांनी खून केला. व सकाळी साडी मध्ये गुंडाळून त्याचा मृतदेह भुलेश्वर घाटात टाकून दिला होता. संगीता चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जेजुरी पोलीसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास जेजुरी पोलीस करत आहेत.