पुणे : पुणे शहरातील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या महिलांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर फोन करत अश्लील संभाषण करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी दिल्लीतून बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
चेतन मासी दासी (वय 32, रा. वीरेंद्रनगर, दिल्ली), त्याची साथीदार कविता अनिल शर्मा (वय 22, रा. उत्तमनगर, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चभ्रु भागातील महिलांचे मोबाइल क्रमांक मिळवून चेतन दासी अश्लील संवाद साधत होता. या महिलांना तो वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवित होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. फिर्याद दाखल झाल्यानंतर या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला. तक्रार तांत्रिक तपासात आरोपी चेतन आणि त्याची साथीदार कविता दिल्लीत वास्तव्यास असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांचे पथक दिल्लीत गेले. पोलिसांनी दिल्लीतील २५० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी आरोपी गाझियाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा मिळाल्यानंतर चेतन आणि कविता यांना पकडण्यात आले.
दोघांना घेऊन पोलिसांचे पथक शहरात दाखल झाले. आरोपींकडून नऊ मोबाइल संच आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.