दीपक खिलारे
इंदापूर : वाळू प्रकरणातील फरार आरोपी युवा फलफले यांच्या शोधासाठी इंदापूर पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला होता. या छाप्याच्या दरम्यान आरोपीच्या वाहिनी (भावाची बायको) यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीच्या विरोधात काल त्या इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्या होत्या. परंतु इंदापूर पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून न घेता, त्यांच्यावर व त्यांच्या पतीवर (आरोपीचा भाऊ) यांच्यावर ३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे पीडितेच्या म्हणणे आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?
इंदापूर पोलिसांनी बुधवारी (दि.२२) रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास उजनी पाणलोट क्षेत्रातील सुगाव गावानजीक नदीपात्रात अवैधरित्या वाळू काढून तिची वाहतूक करणा-या सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून वाळू काढण्यासाठी वापरात येणा-या दोन यांत्रिक बोटी, दोन सक्शन बोटी,२४ ब्रास वाळू असा एकूण ४२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नऊपैकी सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; दोन स्थानिक आरोपी फरार…
या प्रकरणी दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एकूण नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले असून दोन प्रमुख स्थानिक आरोपी फरार आहेत. अटक केलेले सर्व आरोपी मूळचे झारखंड राज्यातील आहेत. मन्सुर रेहमान पलटु शेख (वय ४६ वर्षे,) आश्रफ कालु शेख, (वय२०वर्ष),रहिम ईस्राईल शेख (वय २९ वर्षे), महादेव व्यवहारे(सर्व रा. माळवाडी नं.२, इंदापूर),हैतुल अली अकुमुद्दीम शेख (वय ३२ वर्षे) असीम बबलु शेख वय २१ वर्षे),रेजाऊल अफजल शेख (वय २५ वर्षे), समजाद अजहर शेख (वय ४६ वर्षे,सर्व रा. टेंभुर्णी, ता.माढा, जि. सोलापूर), युवा फलफले (रा.गलांडवाडी नं.१ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. महादेव व्यवहारे व देवा फलफले हे फरारी आहेत.
बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी पोलिसांची दमदार कामगिरी …
पोलीस कर्मचारी विक्रम घळाप्पा जमादार व पोलीस कर्मचारी लक्ष्मण निळकंठ सुर्यवंशी यांनी त्यांच्या विरोधात फिर्यादी दिलेल्या आहेत. त्यानुसार आरोपींविरुद्ध भा.द.वि.कलम ४३९,३७९,३४ सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ९,१५ सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३, ४ सह गौण खनिज कायदा कलम ३ अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडून प्रत्येकी १५ लाख रुपये किमतीच्या दोन फायबर यांत्रिक बोटी, प्रत्येकी ५ लाख रुपये किंमतीच्या दोन सक्शन बोटी व २ लाख ४० हजार रुपये किमतीची २४ ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
यातील आरोपी यांत्रिक बोटीद्वारे उजनी पाणलोट क्षेत्रातील सुगाव गावच्या नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन करत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, पोलीस कर्मचारी विक्रम जमादार, लक्ष्मण सूर्यवंशी, गजानन वानोळे यांनी शासकीय बोटीतून त्यांचा पाठलाग करत सुगावपासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांना पकडले. चौकशीत त्यांच्याकडे वाळू काढण्याचा, बोट चालवण्याचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला.