दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील बावडा येथे बुधवारी दि. १ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास बेकायदेशीर हातभट्टी दारूवर इंदापूर पोलीसांनी धाड टाकून दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर कर्मचारी असे मिळून प्रोहिबिशन रेड पथकाद्वारे धडक कारवाई केली.
यात बावडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करुन मानवी शरीरास अपायकारक अश्या रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे बॅरल ३ नग, दोनशे लिटर १२ नग, शंभर लिटर १ नग व इतर साहित्य असा एकूण २,४९,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र येथे सुरू आहे.
आगामी होळी, ग्रामदैवत यात्रा, जयंती उत्सव व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस यांच्याकडून अवैध धंद्यावरती धाडी टाकून धडक कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के. बी. शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, लखन साळवी पोलीस शिपाई विकास राखुंडे, विनोद काळे, समाधान केसकर यांनी मिळून केली.