Indapur News | इंदापूर, (पुणे) : इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालठन नं. २ (ता. इंदापुर) येथील चोरीचा छडा लावण्यात इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले असून पोलिसांनी एका अल्पवयीन सह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर त्यांचा एक साथीदार फरार आहे.
शुभम उर्फ दिलशार अशोक पवार (वय – २२, रा. दुधवडी, ता. कर्जत जि. अहमदनगर), उमेश अनिल काळे (वय १९, मूळ रा. लोखंडेवस्ती, कटफळ, ता. बारामती) आदेश अनिल काळे वय १९, रा. लोखंडेवस्ती, कटफळ, ता. बारामती) व एक अल्पवयीन मुलगा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ०४) मध्यरात्री कालठन नं. २ (ता. इंदापुर) गावचे हद्दीत राहत असलेले नवनाथ मेटकरी यांना ५ अनोळखी इसमांनी घरात घुसुन कोयत्याचा धाक दाखवुन तसेच मारहाण करून विवो कंपनीचे दोन मोबाईल व सागर रेडके यांचे घराचे रूमचे कुलूप तोडुन घरातील कपाटातील सोन्याचे दागिणे चोरून नेल्याबाबत इंदापु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने जिल्हापोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तात्काळ गुन्हयांचे घटनास्थळी भेट देवून गुन्हे शोध पथकास तपासाबाबत मार्गदर्शन करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, त्यानुसार गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वरील चार आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आणखी कालठण नं. २ येथे यापुर्वी केलेल्या दोन तसेच वडापूरी (ता. इंदापूर) येथील घरफोडीचे असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आलेले आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. आरोपींनी चोरी केलेले ५ लाख रूपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ३ मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रकाश पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक भरत जाधव, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, शुभांगी खंडागळे, पोलीस नाईक संजय मल्हारे, सलमान खान पोलीस अंमलदार नंदू जाधव, गजानन वानूळे, विनोद लोखंडे, लक्ष्मण सुर्यवंशी, गजेंद्र बिरलिंगे, अमोल खाडे होमगार्ड संग्राम माने यांनी केलेली आहे.