पुणे : कुत्र्यांची भांडणे लागल्याच्या कारणावरून कुत्र्यांना फिरायला घेऊन गेलेल्या दोन तरुणांमध्ये पट्ट्याने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात घडली आहे. याप्रकरणी दोघांनीही परस्परविरोधी तक्रारी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दिल्या आहेत.
प्रतीक संतोष मदने (रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) आणि ओंकार संदीप बोत्रे (वय २१, रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक वसाहत) अशी हाणामारी झालेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार आणि प्रतीक हे श्वानाला फिरायला घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या दोन्ही श्वान एकमेकांत भिडले. त्या वेळी प्रतीकने श्वानांचे भांडण सोडव, असे ओंकारला सांगितले. मात्र ओंकारने मी श्वानांच्या भांडणात पडणार नाही असं सांगितलं आणि तो तिथून निघून गेला. याचाच राग प्रतीकला आला आणि प्रतिकने मागून जात श्वानाच्या चामड्याच्या पट्ट्याने ओंकारवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ओंकार जखमी झाला.
दरम्यान, श्वानाच्या चामड्याच्या पट्ट्याने झालेल्या मारहाणीत ओंकारच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर ओंकार बोत्रे याने प्रतीक मदने याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. यासंबंधी पोलीस नाईक रायकर अधिक तपास करत आहेत.