राजेंद्र गुंड
माढा : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा “दिनकरराव जवळकर राज्यस्तरीय युवा पत्रकार रत्न पुरस्कार” विठ्ठलवाडी (ता. माढा) येथील पत्रकार राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना तर हटकरवाडी (ता. माढा) येथील प्रगतशिल शेतकरी शिवशंकर गवळी यांना “बालाघाट” राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार” राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण व इतिहास संशोधक प्रा. शरद गोरे यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला आहे.
अखिल भारतीय साहित्य परिषदेचे दुसरे बालाघाट मराठी साहित्य संमेलन तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात साहित्यिक व इतिहास संशोधक शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी माजी मंत्री मधुकर चव्हाण, अध्यक्ष अनिलकुमार अनभुले, कवी फुलचंद नागटिळक, परमेश्वर पालकर, ज्ञानेश्वर पतंगे, बबन पवार, तानाजी गावडे, विशाल अनुभुले, बालाजी राऊत, किरण गायकवाड यांच्यासह साहित्यिक, कवी, कथाकार, लेखक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार राजेंद्र गुंड यांनी सन २०१५ पासून पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, कृषी, राजकीय, क्रिडा व आरोग्य क्षेत्रातील प्रश्न व समस्या लेखनीतून प्रभावी व वस्तुनिष्ठपणे मांडल्या आहेत. त्यांच्या विविध बातम्यांची दखल घेऊन अनेक प्रश्न व समस्या मार्गी लावल्या आहेत.
दरम्यान, या बाबींची दखल घेऊन गुंड यांना साहित्य परिषदेच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रगतशील शेतकरी शिवशंकर गवळी यांनी चाळीस एकर क्षेत्रात द्राक्ष व इतर फळबागांचे मागील अनेक वर्षापासून विक्रमी उत्पादन घेतले आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले आहेत त्यांच्या या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.