मुंबई : खासदार नवनीत राणा व त्यांच्या वडिलांनी दाखल केलेला दोष मुक्ततेसाठी अर्ज न्यायालयाने फेटाळला. शिवडी न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच शिवडी न्यायालयाने काढलेल्या अजामीन वारंट देखील योग्य असल्याचे सांगत, वारंटला स्थगिती देण्यास नकार दिल्याने खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सन २०१४ साली मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. शिवडी न्यायालयाने राणा यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला होता, त्याला राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र तेथे देखील राणा यांची निराशा झाली आहे.
जात प्रमाणपात्रासाठी राणा यांनी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. नवनीत राणा यांचे वडिलांनी फसवणूक करून हे प्रमाणपत्र मिळवले असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. त्यानंतर नवनीत राणा व त्यांच्या वडिलांवर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताना गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
जात प्रमाणपत्रामुळे खासदार नवनीत राणा यांची खासदारकी देखील धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. बोगस कागदपत्रे दाखल केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. उच्च न्यायालयाने जातप्रमाणपत्र रद्द केले होते. मात्र, राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च नायायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.