पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. अशातच आता ज्येष्ठ नागरिकाच्या देखभालीसाठी ठेवलेल्या कामगारानेच १३ लाख ९२ हजार रुपयांची फसणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूकीप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार शिवकुमार पोद्दार (वय २६, रा. बलिया, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदाराच्या वडिलांच्या देखभालीसाठी सत्यसेवा नर्सिंग सर्व्हिसेसकडून पोद्दार याला ज्येष्ठ नागरिकाची देखभाल करण्यासाठी ठेवण्यात आले होते. वर्षभरापासून तो तक्रारदाराच्या वडिलांची देखभाल करत होता. ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल बँक खात्याला जोडण्यात आला होता. पोद्दारने बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून वेळोवेळी १३ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.