पुणे : कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ पवन मावळात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांकडून व सामाजिक संस्थेकडून घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत मावळ मधील नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. उत्स्फुर्तपणे शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
या प्रकरणी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय-२४) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरोधात खून, अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कामशेत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तेजस हा अविवाहित असून तो पवना नगर परिसरातील एका बंगल्यावर केअर टेकर म्हणून काम करतो आहे. त्याला मंगळवारी सुट्टी होती. मद्यपान केलेल्या तेजसने सात वर्षाच्या मुलीचे घरासमोरूनच अपहरण केलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि मग तिचा खून केला आहे. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबाबरोबर अवघं गाव तिचा शोध घेत होतं. उशिरा पर्यंत शोध न लागल्याने याबाबत कामशेत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तिथून जाणाऱ्या गाड्यांबाबत देखील चौकशी करण्यात आली.
दरम्यान, बुधवारी शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या गवतात मुलीचा मृतदेह आढळला. घटनास्थळाच्या परिसरात तेव्हा काही तरुण असल्याचं समोर आलं. त्यातून आरोपी तेजसचं नाव पुढे आलं. कामशेत पोलिसांनी तेजसला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी करत नागरीकांनी मोर्चा काढला.