पुणे : बायका, पोरांची विक्री करुन पैसे दे, असे म्हणून व्यावसायिकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद गोपीचंद मेहेर (वय ३९, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव खुर्द येथील एका ४६ वर्षाच्या व्यवसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अॅग्रो कमोडेटी ट्रेडिंगचा नावाचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांनी आळेफाटा येथे डॉक्टरी व्यवसाय करणारे विनोद मेहेर यांना आपल्या व्यवसायात पैसे गुंतविण्यास सांगितले. तेव्हा मेहेर यांनी त्यात आपल्याला रस नाही. असे सांगून फिर्यादी यांना ४ टक्के व्याजाने पैसे दिले. आणि फिर्यादी यांना एप्रिल २०१९ मध्ये २५ लाख रुपये दिले. त्यातील २ लाख रुपये डॉक्टरांनी व्याज म्हणून कापून घेतले.
दरम्यान, ऑक्टोबर २०१९ पर्यंत व्यवहार सुरळीत सुरु होता. त्यानंतर फिर्यादी यांनी मेहेर यांच्याकडून आणखी २५ लाख रुपये व्याजाने घेतले. फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये त्यांनी ३४ लाख ५० हजार रुपयांचा गहू इंदोर येथून घेतला. त्यासाठी ते इंदोर येथे गेले. त्यावेळी लॉकडाऊन पडल्याने ते इंदोरला अडकून पडले.
तेव्हा तेथे माल मिळाला नाही व पैसेही परत मिळाले नाही. नंतर पुण्यात आल्यावर त्यांनी इंदापूर, कराड येथील व्यापार्यांशी व्यवहार केला होता. त्या दोघांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे २२ लाख रुपये त्यांना मिळाले नाही.त्यामुळे विनोद मेहेर यांची रक्कम फिर्यादी परत करु शकले नाही.
त्यानंतर नोव्हेबर २०२० मध्ये डॉक्टरांच्या गुंडांनी आंबेगाव खुर्द येथील घरी येऊन फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुझ्या बायको, पोरांची विक्री करुन पैसे आणून दे. नाही तर तुझ्या घरच्यांना मारुन जीवे ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली.
याप्रकरणी ४६ वर्षाच्या व्यवसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद मेहेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.