पुणे : चेकबुक चोरून दोन मोलकरणींनी ज्येष्ठ दाम्पत्याला तब्बल साडे नऊ लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उंड्री येथे नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोन मोलकरणींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलम साहेबराव दाखले आणि मीनाक्षी लक्ष्मण दाखले (दोघीही रा. महमंदवाडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित सिंग (वय ४४ रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रोहित सिंग यांचे आई-वडिल उंड्रीत एकटेच राहायला आहेत. त्यामुळे घरकाम करण्यासाठी त्यांनी नीलम आणि मीनाक्षी यांना नेमले होते. त्या दोघींनी ज्येष्ठ दाम्पत्याची नजर चुकवून घरातील धनादेश पुस्तक चोरले. त्यावर रक्कम टाकून वेळोवेळी ९ लाख ४० हजार रूपये काढून फसवणूक केली.
दरम्यान, रोहित यांना आई-वडिलांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम कमी झाल्याचे लक्षात आले. रोहित यांनी दोन्ही मोलकरणींची चौकशी केली असता, दोघींचा प्रताप उघडकीस आला. याप्रकरणी रोहित याने नीलम आणि मीनाक्षी यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोघींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते करीत आहेत.