हडपसर, (पुणे) : मांजरी रेल्वे स्थानक परिसरात एका बेवारस महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मांजराई व्हिलेज सोसायटीजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही मृत महिलेची ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी रेल्वे स्थानक परिसरात मांजराई व्हिलेज सोसायटीजवळ एक अनोळखी महिला मृतावस्थेत आढळली. या घटनेची माहिती काही नागरिकांनी हडपसर पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उमेश गिते यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खुनाचे कारण समजू शकले नसून याबाबत हडपसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.