Hinjewadi Crime | पुणे : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक पोलीसांवर वाहनचालकांकडून हल्ले करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहेत. दरम्यान अशीच एक घटना पुन्हा एकदा हिंजवडी येथून समोर आली आहे.
वाहतूकीचे नियमन करत असताना वाहतूक पोलिसाला एका कार चालक महिनेने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 8) सकाळी अकरा ते एक पद्मभूषण चौक, हिंजवडी येथे घडला. या घटनेनंतर कार चालक महिलेला अटक केली आहे.
पोलीस हवालदार रोहिदास धोंडू बोऱ्हाडे असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अमृता शाम केसवड (वय 40, रा. खराबवाडी, चाकण) या महिलेस पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पोलीस हवालदार हे हिंजवडी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते सोमवारी सकाळी अकरा वाजता हिंजवडी येथील पदमभूषण चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी चौकात नाकाबंदी लावली असताना आरोपी महिला कार (एमएच 12/सीडी 8361) मधून आली. तिने सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.