अकोला : पोलिस सेवेत जाऊन देशसेवा करावी, असं तिचं स्वप्न होते. त्यासाठी ती कष्ट, अभ्यास करीत होती, पण नियतीच्या हातात काही वेगळचं होते. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा धावताना मृत्यू झाल्याने पोलिस सराव करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. आधीच वडिलांचे छत्र हरवलेले असताना पोलीस होऊन कुटुंबाला हातभार होईल, असे तिचे स्वप्न होते.
पोलिस भरतीसाठी अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियमवर धावण्याचा सराव करताना 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. पोलिस बनण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी ती अहोरात्र तयारी करीत होती. गेल्या काही दिवसांपासून ती रणपिसे नगर येथील तिच्या बहिणीकडे राहत होती.
रोशनी अनिल वानखडे (रा. धोतर्डी) असे या तरुणीचे नाव आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जीएमसीमध्ये नेण्यात आला आहे. गुरुवारी तपासणीनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.रोशनीच्या मृत्यूमुळे मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे.तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाला की, आणखी कोणत्या कारणाने याचा उलगडा होणार आहे.
धोतर्डी (ता. अकोला) येथील गरीब कुटुंबातील रोशनी हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिच्या कुटुंबात आई, दोन भाऊ आणि बहीण आहे. काही महिन्यांपासून रोशनी पोलिस भरतीसाठी वसंत देसाई स्टेडियमच्या मैदानावर सकाळ-सायंकाळ शारीरिक कसरत आणि धावण्याचा सराव करीत होती. मात्र बुधवारी सायंकाळी धावताना ती अचानक कोसळली. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची हालचाली झाली नाही. त्यानंतर तिला तत्काळ रिक्षातून रुग्णालयात भरती केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.