कोल्हापूर : खेळताना तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ०३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे तालुक्यातील जुना वाशीनाका परिसरात ही घटना घडली आहे.
कृष्णराज राजाराम यमगर (वय ९ महिने, रा. जुना वाशीनाका) असे या गोड आणि गोंडस चिमुकल्याचे नाव आहे.
दुर्घटना घडताच चिमुकल्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र, नाका-तोंडात पीठ गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यामुळे परिसरात आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे राहणाऱ्या सुप्रिया राजाराम यमगर या आपला नऊ महिन्याचा मुलगा कृष्णराज याला घेऊन करवीर तालुक्यातील वडणगे येथे आपल्या आजीकडे आल्या होत्या. दरम्यान, काल संध्याकाळच्या सुमारास कृष्णराज वॉकरमधून चालत खेळत होता. मात्र, चालता-चालता त्याचा गव्हाच्या पिठाच्या भांड्यात तोल गेला आणि तो त्यात पडला.
भांड्यामध्ये पीठ मोठ्या प्रमाणात असल्याने कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ गेले आणि ते पीठ त्याच्या नाका-तोंडात चिकटून बसले. दरम्यान, आजीने त्याला त्वरित त्या भांड्यातून बाहेर काढले आणि नाका तोंडात पीठ गेल्याचे लक्षात येताच त्याला कुटुंबीयांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, दवाखान्यात नेण्यापूर्वीच चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नऊ महिन्यांच्या बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला. परिसरात याबाबतची माहिती करतात सर्वांमधून हळहळ व्यक्त होऊ लागली.