Health पुणे : शरीरात लहानपणापासून कोलेस्ट्रॉल असते. खाण्यावर नियंत्रण ठेऊन नियमित व्यायाम करून आक्रोड खाऊन कोलेस्टेरोलवर नियंत्रण ठेवता येते. असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. फळे-भाज्या हृदयासाठी फायदेशीर असतात, पण जास्त तेलकट पदार्थ टाळावेत, असा सल्ला दिला जातो. त्यातच वाढत्या जीवनशैलीत सायलेंट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच तिशीनंतर नियमित रक्त तपासणी करून साखर, बीपी, कोलेस्ट्रॉल तपासायला हवे. आवश्यकतेनुसार इको चाचणी करावी, असे सांगण्यात येते. Health
हार्ट अटॅक अचानक आणि काही लक्षणांसह देखील येऊ शकतो. एक असतो सायलेंट हार्ट अटॅक जो कोणताही इशारा देत नाही आणि अचानक येऊन एखाद्या व्यक्तीचा जीव घेतो. हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा सर्वात आधी छातीत दुखायला लागते. पण सायलेंट हार्ट अटॅक हा कोणतीही लक्षणं न दिसताच चांगल्याचुंगल्या धडधाकट माणसाला येतो.
आपल्या कुवतीपेक्षा अधिक हालचाली आपण करतो, तेव्हा शरीर आपल्याला छोट्या-मोठ्या अनियमित लक्षणाद्वारे इशारा देण्याचे प्रयत्न करते. चालण्यासारखा साधसोपा व्यायाम आपण टाळतो. बऱ्याच गोष्टी जवळच्या अंतरावर असूनही आपण गाड्या वापरतो आणि व्यायामाला मुकतो. त्यातच आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला चांगले घरगुती आणि पौष्टिक खायला देखील वेळ नसतो.
सर्वाधिक धोका कोणाला?
डॉक्टरांच्या मते, डायबिटीजच्या रुग्णांना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो. जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल आणि तुम्हाला पाय सुन्न होणे, उठताना किंवा बसताना त्रास होणे, लघवी करताना त्रास होणे आणि लैंगिक इच्छा कमी होणे यासारखी लक्षणे जाणवत असतील तर तुम्हाला याचा सर्वाधिक धोका असू शकतो.
सायलेंट हार्ट अटॅकची कारणे?
हार्ट अटॅक येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्लेक म्हणजेच रक्ताच्या नसांमध्ये साचलेला घाणेरडा पदार्थ असतो. ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा देखील समावेश आहे. ते तुमच्या कोरोनरी धमन्यांमध्ये जमा होते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि ऑक्सिजन असलेले रक्त हृदयांच्या स्नायूंपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जाते. हे टाळण्याचा मार्ग म्हणजे आहाराची काळजी घेणे, दररोज व्यायाम करणे, दारू, सिगारेट आणि तंबाखूचे सेवन टाळणे आणि शरीराची नियमित तपासणी करणे आहे.