पुणे : ‘तू काळी आहेस’, असे म्हणून लहान जावेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून छळ केल्याची घटना दिघी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पती, जाऊ आणि दोन दिरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती चंद्रकांत पांडुरंग काळे (वय. २८), दीर दीपक पांडुरंग काळे (वय.४०), दीर भरत पांडुरंग काळे (वय. 37), जाऊ (सर्व रा. दिघी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा १३ सप्टेंबर २०२१ ते २७ डिसेंबर २०२२ कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत महिला सासरी नांदत असताना आरोपी जावेने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तू परत नांदण्यासाठी कशी आली. तुला आमच्या घरात घेणार नाही. तू काळी आहेस, असे म्हणून आरोपींनी तिला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच तुला नांदायला यायचे असेल तर तुझ्या आईकडून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत पीडीतेला उपाशी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकणी पिडीत महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.