पुणे : लष्कर न्यायालयाने हडपसर पोलिसांना बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिली होते. मात्र आदेश देऊनही हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही. यासाठी न्यायालयाने हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना न्यायालयाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी बलात्कार गुन्ह्याच्या प्रकरणात पीडित महिलेने आरोपी विशाल सूरज सोनकर (रा. वानवडी) यांच्यासह दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ॲड. साजिद शाह यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती.
पिडीत महिलेने आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार; तसेच अनैसर्गिक कृत्य करुन आर्थिक फसवणूक केली आहे. पीडित महिलेची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रार अर्जात म्हटले होते. त्यानुसार लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश ६ ऑक्टोबरला दिले होते.
त्यानंतर लष्कर न्यायालयाने आदेश घेऊन पीडित महिला हडपसर पोलीस ठाण्यात गेली. तिने न्यायालयाच्या आदेशाची प्रत पोलिसांना दाखवली आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
दरम्यान, न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी ॲड. साजीद शाह यांनी पुन्हा न्यायालयात अर्ज सादर केला. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे, असे ॲड. शाह यांनी सांगितले आहे.