Hadapsar News हडपसर : पत्नी पळवून नेल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना ससाणेनगर (हडपसर) येथे नुकतीच घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Hadapsar News)
अमोल संदीपान गायकवाड (वय ३४, रा. पांढरेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव), मयूर चव्हाण (रा. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या हल्ल्यात सुषेण उर्फ सुशांत बाळासाहेब चव्हाण (वय-२६, रा. हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषेण आणि आरोपी अमोल गायकवाड हे दोघेही एकाच गावचे आहेत. सुषेणचे अमोलच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. दीड वर्षांपूर्वी सुषेण आणि अमोलची पत्नी पुण्यात पळून आले होते. दोघेजण हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात राहायला आहेत.
दरम्यान, सुषेण आणि पत्नी हडपसर भागात वास्तव्यास असून सुषेण व्हिडीओ पार्लरमध्ये काम करत असल्याची माहिती अमोलला मिळाली होती. अमोल आणि त्याचा मित्र मयूर पुण्यात आले. व्हिडीओ पार्लरमध्ये दोघेजण चेहरा झाकून शिरले. दोघांनी सुषेणवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात सुषेण गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.