Hadapsar News : लोणी काळभोर, ता.२९ : गणेश मूर्तीच्या किंमतीवरुन झालेल्या वादावरून टोळक्याने विक्रेत्याला केली बेदम मारहाण करून स्टॉलची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना हडपसर- माळवाडी येथील एस एम जोशी कॉलेजजवळ रविवारी (ता.२७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात २ अल्पवयीन मुलांसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाजणांवर गुन्हा दाखल
रोहन शिवराज गुजर (वय १८), प्रसाद नारायण पाता (वय १८), सूरज व्यंकटसुखया देवरेड्डी (वय २०), कीर्ती पिल्ले (वय १९, सर्व रा. भौरोबा नाला, चीपरावस्ती, फातिमा नगर वानवडी पुणे) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगाराम टिकारामजी बावरी (वय-६५, रा. एस. एम. जोशी महाविद्यालयाजवळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बावरी हे हडपसर येथील रहिवासी असून ते धंद्याने व्यावसायिक आहेत. त्यांनी एस एम जोशी महाविद्यालयाजवळ गणेश मूर्ती विक्रीचा स्टॉल उभारला आहे. Hadapsar News
दरम्यान, रविवारी (ता.२७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी मूर्ती खरेदी करण्यासाठी आले होते. तेव्हा मूर्तीच्या किंमतीवरुन आरोपींनी फिर्यादी बावरी यांच्याबरोबर वाद घातला. त्यानंतर आरोपींनी बावरी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच स्टॉलची तोडफोड केली. Hadapsar News
याप्रकरणी मंगाराम बावरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २ अल्पवयीन मुलांसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत. Hadapsar News