Hadapsar Crime हडपसर, (पुणे) : आजारी मुलगा सतत बेडवर झोपून असल्याच्या कारणावरून बापाने आपल्याच २८ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
काळेपडळ येथील केतकेश्वर कॉलनीत गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी-वडिलांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभिजीत बाबुराव जायभाय (वय – २८) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आरोपी वडील बाबुराव दिनकर जायभाय (वय – ५०) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुलाची आई सुनिता बाबुराव जायभाय (वय – ४५) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
सहा महिन्यापूर्वी अभिजीत जायभाय याच्या डोक्यात मार लागला होता. त्यामुळे तो अंथरुणाला खिळून होता. तरुण पोरगा काही काम न करता घरात झोपून असल्यामुळे पती-पत्नी सतत वाद होत होते. आरोपी बाबुराव जायभाय हा त्याचा जगून काही उपयोग नाही, आज ना उद्या हा मरणारच आहे” असे वारंवार बोलायचा. यातून नवरा बायको दोघात वाद व्हायचे.
आजारी असल्याने अभिजीत याचा रुग्णालयाचा खर्च देखील वाढत होता. हाच राग मनात धरून आरोपी वडिलांनी गुरुवारी दुपारी गळा आवळून त्याचा खून केला असावा असा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान घर कामाला गेलेल्या फिर्यादी परत आल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांचा लक्षात आला. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास डगळे करत आहेत.