लोणी काळभोर : आजारी आजोबांनी भेटण्यासाठी करमाळ्याला चाललेल्या नातवाचा पुणे- सोलापूर महामार्गावरून जात असताना गतिरोधकावरून दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना कुरकुंभ (ता. दौंड) येथील सीएनजी पंपासमोर रविवारी (ता.१९) चारच्या सुमारास घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्या नातवाचा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बुधवारी (ता.२२) दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. तत्पूर्वीच आजोबांचाही मृत्यू झाल्याने करमाळ्यातील कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सुरज संजय कांबळे (वय-२८, सध्या रा. मांजरी, गोपाळपट्टी पुणे, मूळ रा. भीम नगर, करमाळा, जिल्हा सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज हा मुळचा करमाळ्याचा असून तो कामानिमित्त पुण्याला आला होता. सुरज मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, सुरजचे आजोबा ज्ञानदेव कांबळे हे आजारी असल्याने तो त्यांना भेटण्यासाठी रविवारी (ता.१९) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मांजरीवरून करमाळ्याला दुचाकीवरून चालला होता.
पुणे सोलापूर महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना, सुरजची दुचाकी कुरकुंभ (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील सीएनजी पंपासमोर असलेल्या गतिरोधकावरून रविवारी (ता.१९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घसरली. या अपघातात सुरजला जबर मार लागला होता.
अपघातात जखमी झालेल्या सुरजला तातडीने दौंड येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सुरजची तब्येत खालावत गेल्याने त्याला पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये सोमवारी दाखल करण्यात आले होते. बुधवारी (ता.२२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुरजची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.
दरम्यान, विश्वराज हॉस्पिटलमध्ये सुरजवर उपचारादरम्यान साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला होता. त्यातील १ लाख रुपये सूरजच्या नातेवाईकांनी भरले होते. तर उर्वरित सुरजचे अडीज लाख रुपये बिल माफ हॉस्पिटल प्रशासनाने करावे. अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. यावेळी भाजप पुणे जिल्हा युवती आघाडीच्या उपाध्यक्षा पूजा सणस, उरुळी कांचन भाजप शहराध्यक्ष अमित कांचन व भाजपच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिवसेना वैद्यकिय कक्षाचे उरुळी कांचन येथील अभि पवार यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता.
विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड यांची मदत –
दौंडचे आमदार राहुल कुल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व भाजप सोशल मीडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड यांना संपर्क करून सुरजचे अडीज लाख रुपये बिल माफ करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन डॉ. अदिती कराड यांनी मोठ्या मनाने सुरजचे बिल तत्काळ माफ केले. यांमुळे डॉ. अदिती कराड यांचे सूरजच्या नातेवाईकांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
करमाळ्यातील कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला
सुरजचे आजोबा ज्ञानदेव कांबळे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. तर आजोबांना भेटण्यासाठी निघालेल्या अपघातात जखमी झाल्यानंतर बुधवारी उपचारादरम्यान निधन झाले आहे. या दोन्ही घटनांमुळे करमाळ्यातील कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.