पुणे : सदनिकेची नोंद लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मेदनकरवाडी (ता. खेड) येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी (ता.१४) मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयातून रंगेहाथ पकडले आहे.
राजाराम दामू रणपिसे (वय ५५ , पद- ग्रामसेवक, मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालय ता. खेड) असे रंगेहाथ पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांनी एक सदनिका विकत घेतली होती. सदर सदनिकेची नोंद व घरपट्टी जमा करून घेण्यासाठी आरोपी लोकसेवक रणपिसे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होते.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालय आज शुक्रवारी (ता.१४) सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी रणपिसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आरोपी रणपिसे याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निवाळकर करीत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.