लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सन 2003 मध्ये झालेल्या दरोडा व मृत्यूच्या खळबळजनक प्रकरणात जप्त करण्यात आलेला 1 तोळे.439 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज तब्बल २३ वर्षांनंतर अखेर मूळ फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे . लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार महेश चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे संबंधित महिलेचा शोध घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या हस्ते हा मुद्देमाल अनिता दत्तात्रय टिपे यांना सोमवारी (ता.17) सुपूर्द करण्यात आला.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गोसावी वस्ती परिसरात 8 जुलै 2003 रोजी रात्री दरोडा पडला होता. या घटनेत दत्तात्रय टिपे यांच्यावर हल्ला होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी काही सोन्याचे दागिने जप्त केले होते.

या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये 6.340 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, 0.480 ग्रॅम सोन्याची नथ, 4.800 ग्रॅम सोन्याची बोरमाळ आणि 2.770 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांचे एकूण वजन 14ग्रॅम 390 मिली आहे. गुन्ह्याला तब्बल 23 वर्षांचा कालावधी लोटल्याने हा मुद्देमाल नेमका कोणाचा आणि तो संबंधित फिर्यादीच्या ताब्यात कसा देता येईल, यासाठी आवश्यक कागदपत्रे व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस हवालदार महेश चव्हाण यांनी जुन्या गुन्ह्यांमध्ये जप्त असलेल्या मुद्देमालाची माहिती घेऊन संबंधित मालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच प्रयत्नांतून अनिता टिपे यांचा शोध लागला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून न्यायालयाच्या आदेशानुसार बीएनएसएस कलम 106 (3) पोटकलम 1अन्वये हा सोन्याचा मुद्देमाल अनिता टिपे यांच्या ताब्यात देण्यात आला.
दोन वर्षांत 10 हून अधिक नागरिकांना मुद्देमाल मिळवून दिला
महेश चव्हाण यांनी मुद्देमाल कारकूनाचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत 10 हून अधिक नागरिकांना त्यांच्या गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. जुन्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडे पडून असलेला मुद्देमाल संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे यामुळे कौतुक होत आहे.
एकीकडे आरोपी निर्दोष, तर दुसरीकडे 23 वर्षांनी दागिने परत
विशेष म्हणजे, याच प्रकरणातील दरोडा व मृत्यूच्या आरोपावरून दाखल खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने पुराव्यांतील त्रुटी आणि संशयाचा लाभ देत दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांवरील फिर्यादीचा हक्क न्यायालयीन प्रक्रियेत कायम राहिला. त्यामुळे तब्बल 23 वर्षांनंतर हा ऐवज अनिता टिपे यांच्या ताब्यात देण्यात आला. 23 वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर हरवलेला ऐवज पुन्हा हाती आल्याने अनिता टिपे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.







