दौंड : देऊळगावराजे गावच्या हद्दीत तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे सुरू असलेल्या रमीच्या जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत 7 हजार 200 रुपये रोख, 52 पत्त्यांचे दोन कॅट आणि सुमारे 60 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी, असा एकूण 67 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार (ता. 16) दुपारी साडेतीनच्या सुमारास करण्यात आली.

बबलू किसन सूर्यवंशी (वय 32), धनंजय अशोक साळवे (40), विजय शिवाजी तावरे (41), गुलाब हसनभाई इनामदार (43), विष्णु विठ्ठल केदारी (45) आणि अनिकेत दीपक इतापे (31, सर्व रा. देऊळगावराजे, ता. दौंड) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगावराजे गावच्या हद्दीत तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे बबलू किसन सूर्यवंशी हा काही जणांना एकत्र करून बेकायदेशीरपणे रमी नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनायक प्रकाश सपाटे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

सहायक पोलीस फौजदार संतोष शिंदे यांनी दोन पंचांना बोलावून घेतल्यानंतर पोलिस पथकाने खासगी वाहनाने घटनास्थळ गाठले. वाहन काही अंतरावर थांबवून पोलिस व पंच पायी घटनास्थळी गेले. त्यानंतर अचानक छापा टाकला असता सहा जण खाली बसून रमीचा जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना जागीच ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्याकडून 7 हजार 200 रुपये रोख रक्कम मिळून आली. तसेच घटनास्थळी 52 पत्त्यांचे दोन कॅट आढळले. याशिवाय जुगारासाठी वापरल्या जात असल्याचा संशय असलेल्या MH 42 BD 2564 क्रमांकाची हिरो सीडी डिलक्स मोटारसायकल आणि MH 42 BI 2159 क्रमांकाची स्कूटी, प्रत्येकी अंदाजे 30 हजार रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली.
जप्त केलेला मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे गावातील अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हि कामगिरी दौंड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक प्रकाश सपाटे, सहायक फौजदार संतोष शिंदे, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पोलीस अंमलदार सोमनाथ बापू चौडे, हजारे व तुमकुट यांच्या पथकाने केली आहे.







