पुणे : महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेंतर्गत अर्ज जमा न झाल्यामुळे तब्बल 2 कोटींहून अधिक नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. नाव नोंदणीसाठी दिलेली अंतिम मुदत आता संपली असून, निवडणूक आयोग या मुदतीत वाढ करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेदरम्यान न आलेले किंवा अपूर्ण राहिलेले अर्ज प्रामुख्याने शहरी भागात जास्त आहेत. वगळल्या जाणाऱ्या एकूण अंदाजित मतदारांपैकी जवळजवळ निम्मे नागरिक हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या चार प्रमुख जिल्ह्यांमधील आहेत. यामुळे या भागातील मतदारसंख्येवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
ज्या पात्र नागरिकांना वेळेत अर्ज करता आलेला नाही, त्यांना प्रक्रिया पूर्णपणे बंद झालेली नाही. निवडणूक आयोगाकडून लवकरच ‘प्रारूप मतदारयादी’ प्रसिद्ध केली जाईल. ही यादी जाहीर झाल्यानंतर नागरिकांना यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासता येईल.यादीत नाव नसल्यास ते समाविष्ट करण्यासाठी किंवा अर्जातील चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी निश्चित कालावधीत दावा दाखल करता येईल.

तसेच प्राप्त झालेले सर्व दावे आणि हरकतींची छाननी केल्यानंतरच निवडणूक यंत्रणा अधिकृत अंतिम मतदारयादी जाहीर करणार आहे.








