शिरूर: शिरूर तालुक्यात अंमली पदार्थांच्या बेकायदा विक्रीविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ११० ग्रॅम वजनाचा सुमारे २२ लाख रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रोन) जप्त केला. मलठण येथील राजवाडा चौकात एमडीची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अंमली पदार्थासह मोटारसायकल असा एकूण सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’च्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी अंमली पदार्थांची अवैधरीत्या साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना पोलीस हवालदार तुषार पंधारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिष्नोई (वय ३१) हे दोघे मलठण (ता. शिरूर) येथील राजवाडा चौक परिसरात एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या आदेशानंतर पंचांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक कारवाईसाठी रवाना झाले. आज (ता. १८) रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजून १० मिनिटांना मलठण येथील राजवाडा चौकात छापा टाकण्यात आला.
या कारवाईत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्या ताब्यातून ११० ग्रॅम एमडी अंमली पदार्थ आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
शिरूर तालुक्यात एमडीसारख्या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या साखळीवर झालेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या कारवाईच्या तपासातून एमडीचा पुरवठा कुठून होत होता आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे? याचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.






