पुणे: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता असून, आता या निवडणुका थेट २०२७ मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे.

राज्यात मुदत संपलेल्या २० जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत. या निवडणुका डिसेंबर २०२६ किंवा जानेवारी २०२७च्या सुरुवातीला घेणे सध्या कठीण दिसत आहे. त्यातच राज्यातील १०५ नगरपंचायतींची मुदत फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार आहे. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास एकाच कालावधीत घेण्याचा पर्याय राज्य निवडणूक आयोगासमोर येऊ शकतो.
सध्या राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची म्हणजेच SIR प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदार याद्यांची प्रभागनिहाय विभागणी करावी लागणार आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागवून आवश्यक दुरुस्तीही करावी लागेल. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२६ किंवा जानेवारी २०२७मध्ये निवडणुका घेणे राज्य निवडणूक आयोगासाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे फेब्रुवारी २०२७मध्ये एकत्रित निवडणुका घेण्याची शक्यता चर्चेत आहे.

दरम्यान, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदा आणि संबंधित पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाच्या निकालावरही अवलंबून आहे. त्यामुळे SIR प्रक्रिया, न्यायालयाचा निर्णय आणि निवडणूक आयोगाच्या पुढील निर्देशांनंतरच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अंतिम वेळापत्रक स्पष्ट होणार आहे.







