पुणे : डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. ०१) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
रोहित विजयकुमार देवणे (वय – २५ रा. महाराष्ट्र चौक, आळंदी रोड भोसरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा त्याच्या मित्रांसोबत विमान नगर येथे चायनीज खाण्यासाठी गेलेला होता. शास्त्रीनगर चौकातून जात असताना डंपरच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली आला. डंपरचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर डंपर चालक फरार झाला.
दरम्यान, अचानक झालेल्या या भीषण अपघातामुळे शास्त्रीनगर चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या परिसरातील जड वाहनांची वाढती वाहतूक व त्यामुळे होणारे भीषण अपघात यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.