पुणे : भररस्त्यात तरुणीची ओढणी पकडून विनयभंग केल्याची घटना भोसरी येथील गव्हाणे वस्तीतील एका स्पर्धा परीक्षा केंद्रासमोरील रोडवर घडली आहे. ही घटना रविवारी (ता. २२) रोजी घडली आहे. याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्तंड भिमराव पवार (वय-36 रा. भोसरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी मार्तंड पवार फिर्यादीचा (ऑगस्ट २०२१) पासून वेळोवेळी पाठलाग करत होता. माझे तुझ्यावर प्रेम असून मला तुझ्याशी लग्न करायचे असे सांगत फिर्यादीला मैत्रीण करण्यासाठी जबरदस्ती केली. फिर्यादी यांनी याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, रविवारी (ता.२२) फिर्यादी या एका स्पर्धा परिक्षा केंद्रासमोरील सार्वजनिक रोडवरून पायी जात असताना आरोपी मार्तंड पवारने तिचा पाठलाग केला. तसेच तिची ओढणी पकडून तिला जबरदस्तीने थांबवले. त्यानंतर तिचा हात पकडून गैरवर्तन केले.
तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी मार्तंड पवार याच्यावर आयपीसी ३५४,३५४ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.