लोणी काळभोर, (पुणे) : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोकलेन मशीनचे २ लाख रुपये किमतीच्या ब्रेकरची चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अमोल कांतीलाल कातोरे (रा. पिंपळगाव रोटा ता. पारनेर, जि.अहमदनगर), मदन बाबुराव शिंदे, वय २५, रा. देवणी, ता. रेणापूर, जि. लातूर) आदित्य प्रताप सिंग(वय २३, रा. मध्यप्रदेश हल्ली रा. पिंपळगाव रोटा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जानेवारीला रात्री सात ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी खडी क्रेशर वरील पोकलेन मशीनचे २ लाख रुपये किमतीचे ब्रेकर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार रामदास किसन पाचंगे, (रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिली होती.
सदर घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत असताना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा अमोल कातोरे व त्याचे इतर दोन साथीदार यांनी केला आहे. त्यावरून अमोल कातोरे याचा व त्याच्या दोन साथीदारांचा पिंपळगाव रोटा परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंघाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून पोलिसांनी २ लाख रुपयांचा ब्रेकर व गुन्ह्यात वापरलेला १८ लाख रुपयांचा टेम्पो असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके,राजू मोमीन, योगेश नागरगोजे यांनी केली आहे.