उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर आणि सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चारचाकी वाहने तसेच पाण्याच्या टाकीसह ट्रक चोरी करणाऱ्या आणि चोरीची वाहने खरेदी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) पोलिसांनी आवळल्या आहेत. ओमकार हरी शेळके, (वय १९, रा. होलेवस्ती, उंड्री ता. हवेली), मेहबूब ऊर्फ राजु अब्दुल शेख (वय १९ वर्षे रा. आदर्श कॉलनी, हांडेवाडी ता. हवेली), अशी चोरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. फाजील अहमदखान पठाण (वय २९ रा. बाबानगर, ता. उदगीर, जि. लातूर), असे खरेदी करून विक्री केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडून पाण्याची टाकी, रोख रक्कम, दोन पिकअप वाहने असा एकूण ९ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुमाळ पेट्रोल पंपासमोर रात्रीच्या वेळी ट्रकमधील पाण्याच्या टाकीसह चोरी केल्याची तक्रार अनिल बाबुराव फडतरे (रा. सुपे, ता. पुरंदर) यांनी दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत असताना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. तसेच एका खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली कि, सदरचा गुन्हा हा ओमकार शेळके याने त्याचे साथीदाराचे मदतीने केला आहे. त्यानुसार शनिवारी (ता. २४) उंड्री परीसरातून त्याला आणि मेहबूब ऊर्फ राजु शेख याला ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच गुन्हयातील चोरी केलेला ट्रक आणि पाण्याची टाकी खरेदी करणारा फाजील पठाण याच्याकडून टाकी हस्तगत करण्यात आली. दरम्यान, चोरी केलेला ट्रक अहमद चांदपाशा शेख याला विक्री केला असून त्यातून मिळालेली रक्कम आरोपी फाजील पठाण याचेकडून हस्तगत करण्यात आली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ओमकार शेळके, मेहबूब शेख आणि फाजील पठाण यांच्याकडून चोरीची आणखी दोन पिक अप वाहने जप्त केली आहेत. याबाबत चौकशी केली असता आरोपींनी सदरची वाहने लोणी काळभोर व जळकोट पोलीस ठाणे येथून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून पिक-अप वाहनासह एकूण ९ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना शनिवारी (ता. ०२) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलीस अंमलदार विजय कांचन, राजु मोमीण, अतुल डेरे, स्वप्निल अहीवळे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, धिरज जाधव, सासवड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, पोलीस उपनिरीक्षक अतुल खांदरे, पोलीस अंमलदार गणेश पोटे, जब्बार सय्यद, यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.