न्हावरे: उरळगाव(ता.शिरूर)परिसरातील आफळेवस्ती येथील शेतकऱ्याच्या बागेतून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ५१ हजार २०० रुपयांची डाळींबाची फळे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस डाळींबाची फळे चोरणाऱ्यांचा शोध घेत आहेत.अमोल बाळासाहेब आफळे (वय ३२, रा.उरळगाव-आफळेवस्ती,ता.शिरूर, जि.पुणे) या तरुण शेतकऱ्याने शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
या घटनेची शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (ता.२१) रात्री ९ ते रविवारी (ता.२२) पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान आफळे यांच्या उरळगाव परिसरातील आफळेवस्ती येथील गट नंबर-५१० मधील दोन एकर क्षेत्रावरील डाळींब बागेच्या ७ लाईन मधील झाडांना लगडलेले अंदाजे १ हजार ५१२ किलो वजनाची डाळिंबाची फळे अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून डाळिंबाला प्रती किलो १०० रुपये इतका भाव आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या फळांची एकूण किंमत १ लाख ५१ हजार २०० रुपये इतकी असून,शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या चोरीबाबत कोणास काही माहिती असल्यास शिरूर पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा.असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.







