पुणे : प्लॉट विक्रीच्या बहाण्याने पैसे घेतले, नंतर प्लॉट नावावर करण्यासाठी टाळाटाळ व पैसे देखील परत न दिल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन प्रभाकर बिडकर (रा. क्रांतीनगर, थेरगाव, मूळ- आंबेगाव, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. प्रदीप नातू राठोड (वय ३४, रा. गजानन रेसिडेन्सी, वारजे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार वाकड येथील सम्राट असोसिएट येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथील प्लॉट खरेदी करून देखील त्याचा ताबा फिर्यादीला दिला नाही. हा प्लॉट परस्पर दुसऱ्या व्यक्तीस विकून फिर्यादीकडून प्लॉटसाठी ४ लाख २० हजार रुपये घेतले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून प्लॉटमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली.
फिर्यादी यांच्याप्रमाणे छोगाराम भाटी, स्नेहा सरोदे, विकास सोनवणे, हरीश्चंद्र पवार, नीलेश लोढे, सारिका जाधव, कविता पिल्ले, युवराज गायकवाड, सीताराम यादव यांना देखील प्लॉट विक्रीच्या बहाण्याने पैसे घेऊन त्यांना प्लॉट दिला नाही.
तसेच त्यांचे पैसे देखील परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.