पुणे : महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) योजनेत घर मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची ६० लाखांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला विश्रामबाग पोलिसांनी सातारा परिसरातून ताब्यात घेतले आहे.
संतोष दत्तात्रय पवार (वय ३२, रा. मेढा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पवार व सदर महिला हे एकमेकांची ओळख आहे. पवारने म्हाडाच्या योजनेत महिलेला घर मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. महिलेकडून १६ लाख रुपयांचे ४० तोळे सोन्याचे दागिने तसेच ४२ लाखांची रोकड त्याने घेतली होती. महिलेला विवाहाचे आमिष दाखवून पवारने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. तसेच या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास समाज माध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकीही त्याने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पवारला मेढा ग्रामपंचायत हद्दीतून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.