रत्नागिरी : शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महत्वाचे नेते तसेच माजी मंत्री अनिल परब यांच्यावर दापोली रिसॉर्ट प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करताना मुरुड येथील साई रिसॉर्ट हे अनाधिकृत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीमुळे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असणारे अनिल परब हे अडचणीत आले होते. आता त्याच प्रकरणात दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रूपल दिघे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर परब यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अनिल परब यांच्या मालकीच्या जागेवर पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करताना बांधकाम केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. रिसॉर्ट खरेदी करताना चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा वापरण्यात आला आहे, असा आरोप देखील सोमय्या यांच्या वतीने करण्यात आला होता. सोमय्या यांच्या वतीने या प्रकरणी पुरावे देत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवत हे रिसॉर्ट जमीनदोस्त करावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.
या रिसॉर्टचे पाडकाम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. त्याआधीच अनिल परब यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.