नाशिक : येवला तालुक्यातील चिचोंडी – बदापुर रोडच्या लगत असलेल्या परिसरात दि.५ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती या अफगाणी नागरिकाचा गोळ्या झाडून खून झाला होता. पोलिसांनी खुनाचा छडा लावत चार आरोपी अटक केले आहेत. राज्याच्या परजिल्ह्यातून त्यांना ताब्यात घेतले.
गफार अहमद खान , रवींद्र तोरे, गणेश पाटील, पवन आहेर यांना अटक केली असून प्रॉपर्टीच्या वादातून हत्या झाल्याचं स्पष्ट झाले आहे. एकूण सहापैकी चालक आणि गफार खान हे मुख्य आरोपी, अजून दोन आरोपी फरार आहेत.
येवल्यात येण्याआधी या हत्येचा कट शिजला होता असे पोलिस तपासात पुढे येत आहे. मारेकऱ्यांनी हत्येपूर्वी मुथुट फायनान्स द्वारे कॅश काढली. मृत ख्वाजा चिश्ती याची मालमत्ता मुलाच्या नावावर करत असल्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली.
सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांच्यावर गोळी झाडल्याच्या घटनेनंतर चौघा अद्यात इसमांनी एका वाहनातून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले होते. त्यांचं मृतदेह अजूनही नाशिक येथील शवागारात असून त्यांचे वडील अफगाणिस्थान मधून येणार असल्याचे समजते.