पुणे : एका रिक्षाचालकाने एका व्यक्तीला बिअरच्या बाटलीने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे त्या माणसाला 13 टाके पडले आणि त्याला द्रव पदार्थ वगळता इतर अन्न खाता येत नाहीये. ही घटना 11 जुलै रोजी वानवडी येथे घडली.
सदरची 30 वर्षीय व्यक्ती आपल्या कुटुंबासह कारमधून घरी परतत होती. चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका रिक्षाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. कारचे हेडलाइट आणि मडफ्लॅप तुटल्यामुळे रिक्षाचालकाकडे भरपाईची मागणी केली असता ऑटोचालकाने फिर्यादीच्या चेहऱ्यावर बिअरची बाटली मारली.
फिर्यादीनुसार रिक्षाचालक आठ जणांना घेऊन जात होता आणि त्याने आपली चूक मान्य केली नाही. त्याने पोलिस ठाण्यात जाण्यास नकार देत गोंधळ घालून रस्त्यावर वाहतूक कोंडी केली. त्यानंतर त्याचे स्वतावरचे नियंत्रण सुटले आणि त्याने बाटलीने कार मालकाला जबर जखमी केले.
रिक्षातील प्रवाशांनी त्याला जाब विचारल्याने संशयित आरोपीने तेथून पळ काढला. दरम्यान जखमीला त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. कार मालक म्हणाला, “मी ऑटो चालकाला माझ्यासोबत पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले तेव्हा त्याने माझ्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला.” रिक्षाचालकाविरुद्ध वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत असून तपास करत आहेत.