Fire News| पुणे : फुरसुंगी-उरुळी देवाची या गावांमध्ये महापालिकेचा कचरा डेपो आहे. कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच त्यात आता कडक उन्हाळा असल्याने किरकोळ आगीच्या घटना घडत असतात. शनिवारी (ता.1) अशी आगा लागल्याची घटना कचरा डेपोमध्ये घडली होती. त्यावेळी अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग विजवत आटोक्यात आणली होती.
किरकोळ आगीच्या घटना घडत असल्याने त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र यावेळी आग लागली की लावली गेली असा प्रश्न उपस्थित झाल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
फुरसुंगी-उरुळी देवाची गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद…
फुरसुंगी-उरुळी देवाची गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र हा आदेश कचरा डेपोचे क्षेत्र वगळून काढण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आदेशाच्या दुसर्याच दिवशी कचराडेपोला आग लागली की लावली ! असा संशयाचा धूर तयार झाला असून याबाबत नागरिकांत चर्चा रंगली आहे.
फुरसुंगी-उरुळी देवाची येथे असलेल्या महापालिकेच्या कचरा डेपोविरोधात दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी गेल्या काळात आंदोलने केली. त्यामुळे राज्य सरकारने या दोन गावांचा महापालिकेत समावेश करून आंदोलनातील हवा काढून घेतली. आता या गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढले आहेत.
दोन्ही गावांतील एका गटाने सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे, तर एका गटाने विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आंदोलनांचे हत्यार पुन्हा उपसू नये यासाठी कचरा डेपो महापालिका हद्दीत ठेवल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे. नगरपरिषद करण्याच्या निर्णयाने दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी व महापालिकेला कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध होण्यासाठी ही आग लावली आहे की, खरोखरीच घटना घडली आहे, याबाबत दोन्ही गावांच्या नागरिकांत उलटसुलट चर्चा
सुरू आहे.
फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे महापालिकेतून वगळताना राज्य सरकारने कचरा डेपोची सुमारे दीडशे एकर जागा महापालिकेच्या ताब्यात ठेवली आहे. ही जागा दोन्ही गावांतील रहिवाशांची आहे, त्यामुळे सरकार परस्पर ही जागा महापालिकेला देऊ शकत नाही. दोन्ही गावांना ही जागा परत करावी; अन्यथा आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागेल. असे कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…