दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे अज्ञात दोन तासाचे जन्मलेले नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. त्या नवजात अर्भकास पुढील उपचारासाठी सोलापूर या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.
याप्रकरणी बापू नामदेव पालवे (वय 25 वर्ष रा. बिजवडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदापूर पोलिसात एका अज्ञात स्त्रीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 16 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील ससाने यांच्या घराच्या पाठीमागील वन विभागाच्या क्षेत्रा मधील कच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीमध्ये एक महिला जातीचे नवजात जिवंत बालक अर्भक वय अंदाजे दोन तास कोणीतरी अज्ञात स्त्रीने पूर्णता परित्याग करण्याच्या उद्देशाने उघड्यावर टाकून दिले होते. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहेत.