पुणे : पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी (ता. हवेली) येथे शुक्रवारी (ता.१०) उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पतीसह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षदा आनंद बधे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी हर्षदाची बहिण वर्षा राहुल शिवरकर (वय २२, रा. वाघोली) हिने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आनंद बधे, रंजना बधे, कल्याण बधे (सर्व रा. संकेत विहार, फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्षाची बहिण हर्षदा हिचा आनंद बधे याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून आरोपींनी संगनमत करुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत. आनंद बधे याचे विवाहबाह्य संबंध होते. त्याविषयी हर्षदा हिने विचारणा केल्यावर तिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला.सदर प्रकार हा मे २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला.
दरम्यान, या छळाला कंटाळून हर्षदा हिने १० फेब्रुवारी रोजी सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वर्षा शिवरकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आनंद बधे, रंजना बधे, कल्याण बधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.