ED News | पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील ‘दी सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँके’तील आर्थिक गैरप्रकाराचा तपास अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सुरू असून, या प्रकरणातील गोपनीय माहिती देण्यासाठी लाच मागणाऱ्या ‘ईडी’च्या दोन कर्मचाऱ्यांना ‘ईडी’ने अटक केली आहे.
बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांचे निकटवर्तीय बबलू सोनकर याच्यासह ‘ईडी’चे कंत्राटी कर्मचारी योगेश वाघुळे, विशाल कुडेकर यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दी सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून मूलचंदानी यांच्या घरासह कार्यालयावर ‘ईडी’ने जानेवारी २०२३ मध्ये छापे टाकले होते. मूलचंदानी यांच्यावर बँकेच्या कर्जनिधीचा गैरवापर, व्यवसाय विकास आणि वाहन खरेदीच्या नावाखाली बोगस कर्जप्रकरण मंजूर केल्याचे आरोप आहेत. बँकेच्या संचालकांनी अनेक बनावट कर्ज प्रकरणे केल्याचे निदर्शनास आले आहे.
१३ हजार रुपयांची लाच…
या प्रकरणांचा तपास चालू असताना काही गोपनीय कागदपत्रे ‘ईडी’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून मागण्यात आली. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना सोनकर १३ हजार रुपयांची लाच देत असताना पकडण्यात आले. या संदर्भात कायद्यातील तरतुदीनुसार ‘ईडी’ने अटकेची कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!