बारामती : तुमच्या दूधवाल्याचा पाहुणा आहे अशी खोटी बतावणी करून पुणे, सातारा आणि सोलापुर जिल्ह्यातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या बांदलवाडी (ता. बारामती) येथील ‘डॉन गॅंग’ला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अशोक ऊर्फ डॉन नामदेव गंगावणे, अशोक ऊर्फ कंट्या विश्वनाथ गंगावणे व अनिल रघुनाथ बिरदवडे (तिघेही रा. बांदलवाडी, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डॉन गॅंग’ने पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर, शिरूर, सातारा (शिरवळ) येथील पोलिसांत अशाच प्रकारच्या एकूण १४ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी बार्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन महिलांच्या गळ्यातील दागिने देखील चोरले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही जवळपास १०० ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून शहर पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, दूधवाल्याचे नाव जाणून घेऊन त्या तिघांनी विजापूर नाका, जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीतील तीन महिलांना तुमच्या दूधवाल्याचा पाहुणा असल्याचे सांगून चार लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरले होते, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी दिली.
ही कामगिरी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब मोरे यांच्या पथकातील पोलिस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार व गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे, संदिप पाटील आणि महाडिक यांच्या पथकाने केली आहे.