पुणे : बिहारमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, दारूबंदी कायद्याखाली जर्मन शेफर्ड कुत्रा पकडला गेला आहे. ज्या वाहनात अनेक दारूच्या बाटल्या होत्या त्या वाहनात पोलिसांना कुत्रा सापडला.
कारमध्ये कुत्र्याशिवाय दोन व्यक्तीही होत्या, त्यांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. त्याचवेळी पोलिसांनी सोबत असलेल्या कुत्र्यालाही पोलीस ठाण्यात आणले. आता समस्या अशी आहे की कुत्र्याला फक्त इंग्रजीतच बोललेले समजते. त्याला हिंदी किंवा इतर कोणत्याही स्थानिक भाषेतील आदेश कळत नसल्याने पोलिसांच्या नाकी नऊ आले आहेत.
जर्मन शेफर्डला गेल्या 12 दिवसांपासून बक्सरमधील मुफसिल पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात त्याला विशेष सेवाही दिली जात आहे. फक्त पोलीसच त्याला दूध आणि कॉर्नफ्लेक्स खायला देतात. मात्र, अडचण अशी आहे की त्याला फक्त इंग्रजी भाषा कळते, त्यामुळे पोलिसांना त्याला हाताळणे कठीण जाते. पोलीस ठाण्यातील जर्मन शेफर्ड आजूबाजूच्या लोकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
मालकाच्या चुकांची शिक्षा कुत्रा भोगत आहे
हा कुत्रा, त्याचे मालक सतीश कुमार आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासह उत्तर प्रदेशातील गाझीपूरमार्गे एका आलिशान कारमधून बिहारमधील बक्सरला पोहोचले. जिथे सीमा तपासणीत कारमधून अनेक महागड्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याचवेळी सतीश आणि भुवनेश्वर देखील मद्यधुंद अवस्थेत आढळले. पोलिसांनी तत्काळ दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्यासह कुत्र्याला पोलीस ठाण्यात आणले. तेव्हापासून हा जर्मन शेफर्ड आपल्या मालकाच्या चुकांची शिक्षा पोलीस स्टेशनचा पाहुणा बनून भोगतोय.