नाशिक : नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्याकडे सुमारे दीड कोटीची माया सापडली आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनेशकुमार बागुल यांच्या नाशिकच्या घरातून तब्बल ९८ लाख ६३ हजार रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. तर पुण्यातील घरातून ४५ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. हि कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता.२५) केली आहे.
कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी सेंट्रल किचन बिल मंजूर करण्यासाठी एका ठेकेदाराकडे २८ लाखाची लाच मागितली होती. याप्रकरणी ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तेव्हा बागुल यांना तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीने अटक केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १५ दिवस सापळा रचून ही कारवाई केली.
दरम्यान, नाशिक एसीबीच्या छापेमारीत आतापर्यंत दिनेशकुमार बागुल यांच्याकडे करोडो रुपयांची रोकड सापडली आहे. तर त्यांच्या इतर घरांची झाडती घेतली जाणार आहे. त्यामुळे अधिकची रोकड जप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच त्यांच्या लॉकरची देखील झडती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका कार्यकारी अभियंत्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने त्याने कोणकोणत्या प्रकरणात पैसे घेतले. याचा देखील तपास केला जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.