यवत : पारगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील भीमा नदीपात्रात सलग पाच दिवसात एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर याच कुटुंबातील ३ लहान मुलेही बेपत्ता होती. यातील तीन लहान मुलाचा मृतदेह आज मंगळवारी (ता. २४ जानेवारी) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे.
गेल्या सहा दिवसांत सातवा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे दौंड तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मोहन उत्तम पवार (वय -५० अंदाजे) संगीता मोहन पवार (वय अंदाजे – ४५, दोघे रा. खामगांव ता. गेवराई) त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय-३२) त्याची पत्नी राणी शामराव फुलवरे (अंदाजे वय-२७ ) व त्यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय-७) छोटू शामराव फुलवरे (वय-५) आणि कृष्णा (वय-३) अशी एकूण ७ मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या पारगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत भीमा नदीच्या पात्रात भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छिमार मासेमारी करत असताना बुधवारी (ता १८) रोजी एका स्त्रीचा मृतदेह, शुक्रवारी (ता.२०) पुरुषाचा मृतदेह, शनिवारी (ता. २१) पुन्हा स्त्रीचा तर रविवारी (ता. २२) एका पुरुषाचा मृतदेह असे सलग पाच दिवस ४ मृतदेह आढळून आले. आढळलेल्या मृतदेहांमध्ये दोन पुरुष व दोन स्त्रियांचा समावेश आहे. ते सर्व अंदाजे ३८ ते ४५ वयोगटातील आहेत. तर आता याच कुटुंबातील तीन लहान मुलाचा मृतदेह आज मंगळवारी १ वाजण्याच्या सुमारास आढळले आहेत.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गोयल यांनी यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीमेसाठी तैनात केली आहेत. तर रविवारी सापडलेल्या मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती सापडल्याचे यवत पोलिसांनी सांगितले आहेत. यावरून तपासाला दिशा मिळाली आहे. यावरून यवत पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली आहेत.
दरम्यान, भीमा नदीपात्रात सहा दिवसांत सात मृतदेह सापडल्याने ही आत्महत्या की घातपात हा मोठा प्रश्नचिन्ह पोलीस यंत्रणे बरोबरच स्थानिकांनाही पडला आहे. एकावेळी सलग मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने तर्क-वितर्काना उधाण आले आहे. मात्र हा अपघात आहे, घातपात आहे कि आत्महत्या हे समजू शकले नाही. हा सर्व प्रकार काय आहे हे शवविच्छेदनानंतर उघड होण्यात मदत होणार आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्यचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहेत.