Daund News : दौंड, (पुणे) : पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना शनिवारी (ता. 09) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दौंड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. Daund News
गोकुळा पांडुरंग मेरगळ (वय -41, रा. नंदादेवी, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या विवाहितेने या प्रकरणी गोकुळा यांचे भाऊ रवींद्र आप्पासाहेब कित्तुरे (रा. सांगली) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पांडुरंग बाळकृष्ण मेरगळ (पती), प्रियवृत पांडुरंग मेरगळ (सावत्र मुलगा), रामचंद्र बाळकृष्ण मेरगळ (दीर), सतीबामाई रामचंद्र मेरगळ (भावजय), आणि आबासो आटोळे (पतीचा मित्र) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Daund News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गोकुळा यांचा विवाह २ जुलै २०२३ रोजी नंदादेवी येथील पांडुरंग मेरगळ यांच्याशी झाला होता. पांडुरंग यांचे हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच पती पांडुरंग याने किरकोळ कारणावरून गोकुळा यांचा छळ सुरू केला. “तू रोगीट आणि मनोरुग्ण आहेस, तुझ्या गोळ्या-औषधांचा खर्च मला पेलवत नाही, माहेरून पैसे आण,” असे म्हणत तो सतत टोमणे मारून मारहाण करत असे. Daund News
गोकुळा यांनी गर्भवती राहू नये म्हणून पती पांडुरंग त्यांना जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या द्यायचा. या गोळ्या घेण्यास नकार दिल्यास त्यांना क्रूरपणे मारहाण आणि शिवीगाळ केली जात असे. या छळात पतीला सासरच्या इतर मंडळींचीही साथ लाभत होती. गोकुळा यांचा संसार टिकावा म्हणून माहेरच्या मंडळींनी आणि नातेवाईकांनी अनेकदा नंदादेवी येथे येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही पती आणि सासरच्यांनी छळ थांबवला नाही. असेही फिर्यादीत म्हटले आहे. Daund News
दरम्यान, शनिवारी (ता. 09) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोकुळा यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी दौंड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंभार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Daund News







